नॅनो टेक्नॉलॉजी पासून मंगळ, सूर्यावर पोहोचण्या पर्यंत, उती संवर्धनातून हवे तसे जीव, वनस्पती तयार करण्यापासून तर थेट पृथ्वी शिवाय इतरत्र मानवी सभ्यता वसविण्यापर्यंत, अफाट महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून, सुसाट वेगाने प्रगती करीत असताना, मानवी मनाला अनेक न्यूनगंडांनी पछाडले. इतरांपेक्षा मी मागे तर राहणार नाही असे वाटून प्रत्येक जण हा दुसऱ्याच्या वेगाने पळायला लागला. स्वतःची क्षमता, गरजा लक्षात न घेता प्रत्येक जण एक दुसऱ्याशी स्पर्धा करू लागला. प्रगती साध्य करून घेण्याच्या या प्रचंड स्पर्धेत, नेमक्या कुठल्या टप्प्यावर आपली प्रगती होणार आहे हेच पळणारे विसरले. किंबहुना काहींनी असा टप्पा निश्चित न करताच पळायला सुरुवात केली. यांना जर कुणी विचारले की ही प्रगती कशासाठी ? तर सगळ्यांचे उत्तर जवळपास सारखेच ! प्रगतीतून म्हणे समृद्धी, शांती, आनंद व समाधान मिळेल ! परंतु जगन्नियंत्याच्या हे लक्षात आले की यातल्या बऱ्याचशा मंडळींकडे ह्या चारही गोष्टी असून सुद्धा ते या स्पर्धेत उतरलेत. उलट या जीवघेण्या स्पर्धेमुळे बऱ्याच लोकांनी ह्या चारही गोष्टी गमावल्यात. तेव्हा जगन्नियंत्याने अचानक ही स्पर्धा थांबवली. मैदानावरील पंचाने शिटी वाजवून खेळ थांबवावा तसे ! गेल्या महिनाभरापासून जगातले सर्व स्पर्धक विश्रांती घेत असताना कित्येक विस्मयकारक गोष्टींचा उलगडा लाखो करोडो लोकांना व्हावयास लागला ! लोकांचे स्वानुभवाचे बोल , एकांतवासात कळून आलेले जीवन रहस्य, इतिहास / पुराणातील दाखले, समृद्ध संस्कृती, यथोचित परंपरा या गोष्टींनी व्हॉट्सऍप, फेसबूक सारखी माध्यमे ओसंडून वाहू लागली. एखाद्या घोड्याच्या डोळ्यांवरील झापडे काढावीत अन रस्त्या खेरीज इतरत्र रम्य निसर्ग पाहून हर्षातीरेकाने घोडा बेधुंद व्हावा, त्याच प्रमाणे कोरोना संकटामुळे आलेल्या अपरिहार्य एकांतवासात लोकांना, शांती, आनंद व समाधान कमी-जास्त प्रमाणात त्यांच्या आसपासच असल्याचे उमजून आले. राहता राहिली समृद्धी ! तर ती प्रत्येकाने आपली व समाजाची प्राथमिकता व गरज लक्षात घेऊन मिळवायची असते हे बऱ्याच लोकांना कळून आले ! प्रगतीच्या या जीवघेण्या स्पर्धेत सामील नसलेले किंबहुना स्पर्धेच्या नियमांनी बाद ठरविलेले काही समाज घटक होतेच पण त्यांना समाजाच्या मोठ्या वर्गाने अडाणी, अल्पसंतुष्ट , मागासलेले व प्रगतीस अडसर ठरवत बेदखल करायला सुरुवात केलेली होती. गरीब,वेडे, वृद्ध,असहाय,साधू-संन्यासी हाच तो स्पर्धेबाहेर चा वर्ग. घर-दार उघड्यावर टाकून समाज कल्याणासाठी आयुष्य वेचणारे व्रती सुद्धा याच वर्गातले ! कारण ते वेड्यांच्या व्याख्येत चपखल बसतात !

देशातील वा पृथ्वीवरील सहजीवन अधिक समृद्ध व सुकर व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरून प्रयत्न करायलाच हवेत. अनंताचा शोध घेऊन जीवसृष्टीचे किंवा विश्वाचे गुढ उकलण्याचे प्रयत्न, भविष्यातील अडचणींवर उपाय शोधताना मार्गदर्शक ठरतील. परंतु भौतिक प्रगती साधताना, सामाजिक समतोल न राखल्याने समृद्धी,शांती, आनंद व समाधान मिळणे दुरापास्तच असेल. सुदैवाने भारतीयांना या सर्व गोष्टी अगदी प्राचीन काळापासून वारसा म्हणून लाभलेल्या आहेत. जीवनविषयक तत्वज्ञान असो अथवा गणित, वैद्यकशास्त्र, खगोल शास्त्र इत्यादी विषयांचे ज्ञान असो, हे भारतीयांना शेकडो हजारो वर्षांच्या परंपरेनेच मिळाले होते. जगभरात भारताची यासाठीच ख्याती होती व म्हणूनच जगभरातून अभ्यासक या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी नियमित भारतात येत असत. परंतु सातव्या आठव्या शतकाच्या आसपास राजघराण्यांचे आपसी कलह, लढाया त्यातच परदेशी आक्रांत्यांची लुटमार, या सर्व गोंधळात येथील संस्कृती, शिक्षण पद्धती व संशोधनाचे प्रचंड नुकसान झाले. भारतीय संस्कृतीत ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व तत्त्वज्ञानाची सांगड अध्यात्माशी घातली गेलेली असल्याने व बहुतांश भारतीय समाजावर अध्यात्म, धर्म व नीतिमूल्यांचा पगडा असल्याने, समाजाने हा वारसा येणार्‍या पुढच्या पिढ्यांकडे सोपवला.

परदेशी आक्रमकांनी येथून साधन संपत्ती लुटून नेण्या ऐवजी येथेच स्थायिक होण्याचे जेव्हा ठरविले तेव्हा सोळाव्या सतराव्या शतकात भारताची अर्थव्यवस्था, युरोपियन देशांच्या एकत्रित अर्थव्यवस्थेपेक्षा वरचढ होती तथा जागतिक अर्थव्यवस्थेच्या 24.4 टक्के एवढी होती. एकट्या भारताचे औद्योगिक उत्पादन जगाच्या एकूण औद्योगिक उत्पादनाच्या 25% पेक्षा जास्त होते. परंतु 19 व्या शतकाच्या सुरुवातीला आधुनिक युगाची (Modern period) जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पूर्णपणे पारतंत्र्यात असलेल्या भारतीयांवर आधुनिक विज्ञान व पाश्चिमात्य देशांनी गारुड केलेले होते. पाश्चिमात्त्यांचे अनुकरण म्हणजेच प्रगती, हे इंग्रजांनी भारतीय समाज मनावर ठसविले.

प्रचंड आर्थिक शोषण करतांना, भारतीय समाज कायमच गरीब, परावलंबी व गुलाम असल्याच्या मानसिकतेत कसा राहील याचे नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. त्याकरिता येथील इतिहास, शिक्षण पद्धती, समाजरचना अशा अनेक गोष्टींत इंग्रजांनी आपल्या सोयीनुरूप बदल घडवून आणले. त्या बदलांचा प्रचंड प्रभाव हा तत्कालिक नसून अजूनही भारतीय समाज मनावर कायम आहे. बऱ्याचशा ऐतिहासिक घटना, समृद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा, शेकडो हजारो वर्षांच्या परंपरा ; यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण, शास्त्रोक्त चिकित्सा तथा आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या साह्याने समर्पक स्पष्टीकरण न करता आल्याने बर्‍याचशा गोष्टींना दुर्लक्षित करण्यात आले. मुळातच श्रद्धाळू असलेल्या भारतीय समाजातील एक वर्ग मात्र या गोष्टींपासून फारकत घ्यायला तयार नव्हता. त्यांस मागासलेला, असंस्कृत, अंधश्रद्धाळू तथा अव्यवहारी म्हणून हिणवण्यात आले. तेही काही अंशी खरेच होते. बदलत्या काळानुरूप काही चालीरीती अव्यवहारी तथा अमानवीय होत्या. ठराविक वर्गाचे समाजावर वर्चस्व राहावे म्हणून बळजबरीने लादलेल्या होत्या. एकूणच समाजाचा पर्यायाने देशाचा विकास घडवून आणण्याकरिता पाश्चिमात्यांची जीवनशैली, शिक्षण पद्धती, तंत्रज्ञानादी विकास कसा आवश्यक आहे याची देशातील नवशिक्षितांना ( सुशिक्षित ) खात्री झाली. आणि एका खंडप्राय देशाची विकासाची दिशा निश्चित झाली.

स्वातंत्र्योत्तर काळात जन्म झालेल्या तमाम भारतीयांना विशेषतः जागतिकीकरणानंतर गतिमान जीवन व्यतीत करणाऱ्यांना मागे वळून पहायला वेळच मिळत नव्हता. कोरोना लॉकडाऊन मुळे अपरिहार्यपणे मिळालेल्या विश्रांती मध्ये समस्त बुद्धिवाद्यांना तसेच सामान्यजनांना कित्येक विषयाची समीक्षा करण्यास संधी मिळाली. विकास आणि आधुनिकतेचा तोरा मिरवण्यासाठी दैनंदिन जीवनातील कित्येक लहान-मोठ्या गोष्टींमध्ये पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून आपण आपलीच जीवनपद्धती कठीण, असहज, कृत्रिम व परावलंबी करून ठेवल्याचे लक्षात येते. शिक्षण, आरोग्य, वेशभूषा, आहार, कुटुंब व्यवस्था, समाजरचना, विज्ञान-तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म, नीतिमूल्ये अशा कितीतरी क्षेत्रात भारतीय समाज जगाच्या तुलनेत आघाडीवरच होता. गरज होती ती, काळानुरूप घेतलेल्या शिक्षणाच्या आधारे, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीच्या आधारे, सुशिक्षितांच्या विवेक व प्रतिभेच्या आधारे, ही आघाडी टिकवून ठेवण्याची. उशिरा का होईना या सर्व बाबींचे आकलन समाजातील प्रत्येक वर्गास होऊ लागले. जगाच्या आखाड्यातील शर्यत ऐन रंगात आलेली असताना, जगन्नियंत्याने अचानक ही शर्यत थांबविली तीच मुळात चुकलेली दिशा व रस्ता दाखवण्यासाठी !

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मातृभाषेतच दिल्या जावे, हे जगातील सर्व ख्यातनाम शिक्षणशास्त्री सांगत असताना आपण इंग्रजीचा धरलेला अट्टाहास,
हा केवळ आपले मूल जगाच्या स्पर्धेत मागे पडायला नको याच साठी आहे. विविध क्षेत्रात भारताचे नाव जगात गाजविणारे जास्तीत जास्त बुद्धिवंत, त्यांचे शालेय शिक्षण मातृभाषेतूनच शिकले. आजही इस्रो सारख्या जगविख्यात संस्थेत कार्य करणारे बहुतांश वैज्ञानिक मातृभाषेतूनच शालेय शिक्षण घेऊन आलेले आहेत. एकिकडे सचिन तेंडुलकर, मेरी कोम, वॉल्ट डिस्ने, रिचर्ड ब्रॅन्सन, टॉम क्रुज, कपिल देव, ऐश्वर्या राय यांसारखे हजारो दिग्गज तर औपचारिक शिक्षणाशिवाय विविध क्षेत्रात यशस्वी झालेले दिसतात. तर दुसरीकडे सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये एम ए, बी ई, एम एस्सी झालेले युवक अर्ज करताना दिसतात. याचाच अर्थ, काय व कशासाठी शिकायचे याची स्पष्टता राहिली नसून युवक नुसतेच सुशिक्षित (पदवीधर) होत आहेत.

विविध व्याधी व दुर्धर रोगांवर उपचार करण्यासाठी आर्थिक, मानसिक, कौटुंबिक ताण सहन करून केविलवाणी धडपड करताना सामान्यजन दिसतात.
परंतु मुळातच निरोगी राहण्याचे, शारीरिक मानसिक व बौद्धिकदृष्ट्या सशक्त राहण्याचे शास्त्र जग भारताकडून शिकू पाहतेय. आधुनिक वैद्यकशास्त्रात प्रगती करताना योगाभ्यास व आयुर्वेदाकडे आपले खूप दुर्लक्ष झाले. या देशातील वातावरण, पर्यावरणपूरक जीवनशैली व उपलब्ध संसाधनांवर आधारित वेशभूषा, आहार, कुटुंब व समाजरचना बदलवून आपण अधिकाधिक प्रगत व आधुनिक दिसण्याचा प्रयत्न करू लागलो. स्पर्धेत टिकण्यासाठी नीती मूल्यांना तिलांजली देऊ लागलो. ज्यांच्या हे लक्षात आले तेसुद्धा असहाय असल्यासारखे मूक दर्शक बनून राहिलेत.

नवीन युगातली अत्याधुनिक संसाधने वापरताना जुना ठेवा दुर्लक्षून चालणार नाही. उलट त्याची नवीन गोष्टींसोबत सांगड घालत, त्यास अधिकाधिक उपयुक्त, समृद्ध करुन नवीन पिढीस सोपविता येईल. तसेच पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणे छोट्या गाव खेड्यांतील कुशल कष्टाळू व कुशाग्र मनुष्यबळ महानगरांच्या विकासासाठी वापरल्यास, त्यांची मूळ गावे तुलनेने कायम मागासलेलीच राहतील. प्रगतीच्या वाटचालीचे सिंहावलोकन करण्यासाठी, जगन्नियंत्याने प्रथमच एवढी दीर्घ विश्रांती दिली. शहर महानगरांतील गर्दी कमी करून, अत्याधुनिक साधनांच्या जोडीला समृद्ध वारसा घेऊन, ग्रामीण भागातच पायाभूत सुविधा व रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्यास, प्रत्येक गाव, जिल्हा, प्रदेश आत्मनिर्भर होईल . खऱ्या विकासाच्या दिशेने जाणारा रस्ता आपण चुकलो असून, थोडे उलट पावली गेल्यास योग्य वेळ व दिशा साधल्या जाऊन , विकासाचा समतोलच काय, सर्वव्यापी शाश्वत विकास घडवून आणता येईल.

विनय वैद्य
अमरावती
myblog@seatco.in

Categories: Seatco Solar

3 Comments

Kishor Narsingrao Deshmukh · April 24, 2020 at 11:33 pm

Vinay, Good write

    Shubham Mahalle · April 25, 2020 at 6:46 am

    Nice sir

    Ajay gathe · April 26, 2020 at 7:27 pm

    Very nice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *